/

Sunday, January 27, 2019

येळवस (दर्श वेळा अमावस्या) मराठवाडा तील लातूर उस्मानाबाद जिल्ह्यातील शिवार पूजन..


लातूर, उस्मानाबाद, नांदेड ,सोलापूर कर्नाटक व आंध्रप्रदेशातील काही भागात साजरा होणारा शेतकऱ्यांचा वनोत्सव..
*येळवस! मार्गशीर्ष अमावस्या! शेतकरी कुटुंबाची वार्षिक पिकनिक! घरची सर्व मंडळी, जवळचे नातेवाईक, शेजारी पाजारी राहाणारे स्नेही आणि इतर मित्रमंडळी यांच्यासोबत एकत्र जमिनीवर बसून निसर्गाच्या सानिध्यात हसत खेळत एकमेकांच्या आवडी निवडी जपत सात्विक आहार सेवन करणे, हसणे-हसविणे, प्रेमालाप करणे, एकमेकांच्या सुखात दिलखुलासपणे सहभागी होणे याद्वारे जीवनातले अल्पस्वल्प सुख हजारपटींनी वृद्धींगत होत असते. म्हणूनच आमच्या दृष्ट्या पूर्वसुरींनी निसर्गाशी सांगड घालत वेगवेगळ्या सणावारांची, उत्सवांची चपखल योजना करुन ठेवली आहे. येळवस त्यापैकीच एक आहे. मार्गशीर्षात हवामान स्वच्छ असते. वातावरणात सुखद गारवा असतो. पावसापाण्याची किंवा उष्ण हवेची अडचण सहसा नसते. गहु, हरभरा, ज्वारी तारुण्याच्या उंबरठ्यावर असतात. तुरी परिपक्व झालेल्या असतात. भूईमुगाची वावरं रिकामी झालेली असतात. लेकुरवाळ्या गावरान बोरी पिवळ्या धमक गाभुळल्या टपोर्‍या बोरांना अंगाखांद्यावर प्रेमाने खेळवत असतात. गावरान आंब्याच्या झाडांना नवचैतन्य देणारा सुगंधी मोहोर यायला सुरुवात झालेली असते. त्यातला मध शोषून घेण्यासाठी मधमाशांची लगबग अविरत सुरु असते. पायवाटांच्या दुतर्फा, ओढ्याकाठी, शेताच्या बांधांवर, पडकात तरवटांच्या पिवळ्या धमक फुलांचा ताटवा सजलेला असतो. बळीराजा, रानपाखरं आणि निसर्गातला प्रत्येक घटक प्रसन्न असतो. कौटुंबिक पिकनिकसाठी यापेक्षा सुंदर स्पॉट इंद्राच्या स्वर्गातही सापडणार नाही. पंचतारांकितच काय सहस्त्रतारांकित हॉटेल्सची बातच करु नका! म्हणूनच बळीराजाच्या जीवनात आमच्याकडे येळवसीला अनन्य साधारण महत्व असते. गावात दिवाळी सण साजरा केल्यानंतर आम्हाला वेध लागतात ते दोन महिन्यानंतर शेतात साजरा करावयाच्या येळवस सणाचे! येळवसीला आमच्याकडे सार्वजनिक सुट्टी असते. खेड्यांचे झपाट्याने शहरीकरण होत असले तरी इकडे आमच्या मराठवाड्यात काळ्या मातीशी नातं सांगणार्‍या काही प्रथा अजून जीवंत आहेत. त्यातलीच ही अमावास्या. गावात वेगळाच उत्साह संचरलेला असतो. रात्री फारसं कुणी झोपतच नाही. भल्या पहाटे स्वयंपाकाला सुरुवात होते. बोरं, गाजरं, घेवडा, चुका इत्यादि चौदा फळ आणि पालेभाज्या एकत्र करुन हंड्यात शिजवलेल्या या भाजीची चव कुठल्याही पंचतारांकित ‘हंडी’ला येणार नाही. गव्हाची मराठवाडी खीर; गुळाच्या पोळ्या; सजगुर्‍याचे, कनकीचे, शेंगदाण्याचे चविष्ट उंडे, तिखट आमटी, भात आणि खास आंबील! खाणे आणि खा‌ऊ घालण्यात मराठवाडी मानसाचा हात कुणीही धरु शकत नाही. स्नानादी उरकून लवकरात लवकर शेतावर जायची लगबग सुरु होते. बैलांच्या गळ्यातील चंगाळ्यांचा आणि गाडीच्या चाकांचा होणारा लयबद्ध आवाज काही औरच असतो. सकाळी न‌ऊ वाजेपर्यंत सारा गाव रिकामा होतो. सारा गाव शेतात उतरतो. शिवाराशिवारांत ‘हर हर महादेव’च्या ललकार्‍या घुमू लागतात. बांधावरच्या झाडाला कडब्याच्या पेंड्या बांधून तयार केलेले दे‌ऊळ, त्यात पांच पांडव, कुंती आणि द्रौपदी स्थानापन्न. त्यांची विधीवत पुजा करुन सार्‍या पक्वांनाचा, फळफळावळांचा नैवद्द दाखविला जातो. गायी बैलांना घास भरविल्यानंतर पंगत बसते. हवेत सुखद गारवा, अंगावर कोवळे ऊन, डोक्यावर निळेशार आकाश, सभोवार डोलणारी पिकं आणि झाडाझुडपांवर कलकलाट करणारे विविध पक्षी. आनंदाचे डोही, आनंद तरंग ! तिसर्‍या प्रहरी एकमेकांकडे जा‌ऊन आंबील पिण्याचा कार्यक्रम सुरु होतो. या आंबीलची सर कुठल्याही देशी-विदेशी पेयाला येणार नाही. कारण ती पिल्यानंतर नशा येत नाही आणि ही आंबील जेवनानंतर घेतली जाते, आधी नाही! दुपारी पाच वाजल्यापासून बायका पोरं परतीचा प्रवास सुरु करतात. ठराविक पुरुष मंडळी मागे थांबतात. अंधार पडल्यानंतर बांधांवर तीळाच्या सरमाडाच्या शेकोट्या पेटविल्या जातात. असं म्हणतात की पूर्वी ‘हिव’ येत असत व त्यात पिकं कडकून जात असत. त्यासाठी या शेकोट्या! आपल्या रोजच्या सर्व अडचणी, समस्या घरी कुलुपबंद करुन कुटुंबासह मोकळ्या मनाने आनंदाचा आस्वाद घेणे यापरते दुसरे कोणते सुख असू शकते? निसर्गाच्या विलोभनीय छटा, सुंदर सुंदर दृशावली... महानगरवासीयांनो, तांत्रिक सुखसोयींच्या बनावटी कृत्रिम जगातून बाहेर पडून पुन्हा एकदा निसर्गाच्या सान्निध्यात जाऊन प्राकृतिक वातावरणात स्वत:ला तादात्म्य प्राप्त करुन घेण्यासाठी आपल्याला नव्याने प्रयत्न करावे लागतील. आपले पाय ग्रामीण भागाकडे वळवावे लागतील. शेतकर्‍यांच्या येळवसीप्रमाणेच महानगरवासीयांनी त्यांचा २९ डिसेंबर ग्रामीण भागात जाऊन निसर्गाच्या कुशीत साजरा करायचे मनावर घेतले तर ग्रामीण अर्थव्यवस्थेला पाठबळ मिळेल आणि त्यानिमित्ताने एक सुंदर पिकनिक साजरी केल्याचा सात्विक आनंद मिळेल; नववर्षाचा उगवणारा भास्करही हर्षोल्लित होईल! गोडधोड खाऊन आपण आपल्या रसनेला सुख देत असतो त्याप्रमाणे परस्पर संबंधात गोडवा निर्माण करुया! आपले व आपल्या सहवासातल्या लोकांचे जीवन पुन्हा पूर्वीसारखे अनौपचारिक पातळीवर नेऊया! त्यासाठी निसर्गाशी दोस्ती करावी लागेल. आपण निसर्गाच्या जेवढे अधिक समीप जाऊ तेवढे अधिक मोकळे होऊ, नैसर्गिक बनू, स्वाभाविक बनून जीवनाचा निर्भेळ आनंद लुटू शकू! शुद्ध आनंदाच्या नैसर्गिक डोहात बुडी मारली की आनंदाचे डोही आनंद तरंग निर्माण होतात आणि जीवन हवेहवेसे वाटू लागते. आपल्याला यापेक्षा आणखी काय हवे आहे! यंदा *येळवस १७ डिसेंबर २०१७* रोजी येत आहे. तामसिक झिंग उतरली असेल तर येळवसीची सात्विक झिंग अनुभवण्यासाठी शेतावर सहकुटुंब जरुर जरुर जा. मी तर निघालोच आहे! सतीश धड़े संपादक कोळी समाज संदेश

No comments:

Post a Comment

प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण करणार--रमेश दादा पाटील अध्यक्ष कोळी महासंघ.

कोळी महासंघाचे अध्यक्ष रामेशदादा पाटील यांनी महाराष्टरतील 30000 महिलांना प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या माध्यामातून रोजगार मिळवून देण्याचा स...