/

Sunday, June 3, 2018

शिवप्रेमी..धारकर्यांच्या  दोन दिवसांतील मेहनतीने सिंहगड कोळीवाड्याचे रूप पालटले..दत्ता जोरकर 

Image result for sinhgad        वर्षोंवर्ष दुर्लक्षीत असलेल्या किल्ले सिंहगड लगतच्या ऐतिहासिक ..कोळीवाड्याचे ठिकाणी दोन दिवसीय कोळी वाडा संवर्धन मोहिम राबविण्यात आल्यानंतर घेरा सिंहगड (ता.हवेली,जि.पुणे) येथील कोळीवाड्यावरच्या जुण्या ऐतिहासिक स्मृतींना प्रथमच उजाळा मिळाला.गड परिसरातील डोंगर उताराच्या परिसरातील दगड मातीच्या ढिगाऱ्याखाली व घनदाट झाडाझुडुपांमध्ये हरवलेल्या  आपल्या पुर्वजांच्या आठवणीचा ठेवा समजल्या जाणाऱ्या काही स्मारकांचे जुणे अवशेष आदिवासी कोळी महादेव समाजाच्याच नव्हे तर समस्त शिवप्रेमी- गडप्रेमींच्या द्दृष्ठिक्षेपात आता आले आहेत. *शिवाधिन दुर्ग संवर्धन संस्था, महाराष्ट्र राज्य*  या दुर्गप्रेमी  संस्थेच्या विशेष पुढाकाराने हि मोहीम राबविण्यात आली. हि दुर्ग संवर्धन संस्था गेल्या काही वर्षांपासुन राज्यातील गड-दुर्गांचे व ऐतिहासिक वास्तुस्थळांचे संवर्धनासाठी प्रयत्नशील असते.राज्याच्या कानाकोपऱ्यातील शिवप्रेमी- दुर्गप्रेमी युवक या संस्थचे सक्रीय सभासद - धारकरी आहेत.संस्थेच्या मदतीने सिंहगडावर या पुर्वीही आम्ही दोन-तीन गडसंवर्धन व स्वच्छता मोहिमा राबविल्या होत्याच.अतिशय निस्वार्थी भावनेतून व श्रमदानातून काम करणाऱ्या या युवकांच्या बरोबर काम करण्यात जो आनंद व समाधान मिळते ते खुप काही शिकवून जाते.शिवप्रेमी संस्था,संघटना व अशा काही ग्रुपमध्ये एक कार्यकर्ता म्हणून काम करत असताना मलाही नेहमीच सिंहगडाचे हितासाठीच काम करण्याची  संधी मिळते.सिंहगडाचे तटबंदीखाली असलेल्या याच  कोळीवाड्यावर शिवाधिन दुर्ग संवर्धन संस्थेच्या वतीने आम्ही २१ व २२ एप्रिल २०१८ अशी सलग दोन दिवस *" सिंहगड कोळीवाडा संवर्धन मोहिम "* राबविली.वेगवेगळ्या ठिकाणचे जवळपास 55 ते 60 शिवप्रेमी कार्यकर्ते या  मोहिमेत सहभागी झाले होते. पुणे शहर- परिसर,पिंपरी- चिंचवड,सातारा,अकोला, अहमदनगर,सोलापूर, कोल्हापूर,पनवेल, मुंबई, पंढरपूर,उस्मानाबाद तसेच पुणे जिल्ह्यातील हवेलीसह वेल्हे तालुक्यातील कार्यकर्ते व आमचे घेरा सिंहगडमधील आतकरवाडी व दुरुकदरा या गावातील आदिवासी कोळी महादेव समाज बांधवसुद्धा यात सहभागी झाले होते. शनिवारी २१ एप्रिल २०१८ रोजी सकाळी  8.30 वाजता  सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या समाधीस्थळी पुजा करून हे कार्यकर्ते एकत्रीतपणे सिंहगडाच्या अवघड अशा तानाजी कड्यातुन (चोरवाटेने) खाली कोळीवाड्यावर दाखल झाले होते.आम्ही काही कार्यकर्ते दुसऱ्या मार्गाने लांबच्या पण सोप्या मार्गाने काळुबाई मंदिराकडुन भडाळेवाडी- थोपटेवाडी दिशेने खंडूजी नाईक-कोळी यांच्या या दुर्लक्षित कोळीवाड्यावर म्हणजेच अमृतेश्वर मेटावर पोहचलो.आमचे सहकारी मित्र व इतिहास संशोधक- सिंहगडाचे अभ्यासक श्री.नंदकिशोर मते* यांनी सिंहगड व घेरा सिंहगड चे कोळीवाडे आणि येथील ऐतिहासिक पुरातन ठेवा आणि त्याचे संवर्धन या बाबत आम्हाला मार्गदर्शन केले व खर्या अर्थाने या मोहिमेस सुरुवात झाली. मोहिमेच्या पहिल्याच दिवशी शनिवारी संपुर्ण परिसराची पाहणी करून येथील जुणे भग्नावस्थेतील पडलेले मंदिर,खंडोजी नाईक-कोळी जोरकर यांच्या जुन्या वाड्याची तसेच आजुबाजुला असलेल्या जु्ण्या अवशेषांची व दुर्लक्षित स्मारकांची माहिती घेतली.तेथे व्यवस्थित  जाण्यासाठी सुरळीत पाऊलवाट तयार करीत या परिसराच्या सफाईचे काम आम्ही हाती घेतले अगदी संध्याकाळ पर्यंत ते चालले. खरंतर माझा या कोळीवाड्याशी संबंध येत असताना व या घराण्याशी संबंधित असुनही मी येथील हि दुर्लक्षीत ठिकाने व विस्मरणात गेलेल्या या स्मारकांचे बाबतीत कधीच  गंभीर नव्हतो.कधीतरी येथे यायचे व मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचे आणि वर्षातून एकदा जागरण गोंधळाचे आयोजनासाठी पूढाकार घेणे व किल्ले सिंहगडच्याच विकास व सुधारणेसाठी  पाठपुरावा करत रहाणे एवढेच नियमित सुरु असायचे.मात्र शिवाधीन दुर्ग संवर्धन संस्था तसेच माझे सहकारी मित्र- मार्गदर्शक इतिहास संशोधक व सिंहगड चे अभ्यासक नंदकिशोर मते यांनी या संवर्धन मोहीमेच्या निमित्ताने कोळीवाड्याचे संवर्धनासाठी ची जबाबदारी सोपवुन खर्या अर्थाने मलाही कोळीवाड्यांचे संवर्धन व विकासाची आणि जबाबदारीची जाणीव करून दिली असेच म्हणावे लागेल. शनिवारी रात्रीचा मुक्कामही याच कोळीवाड्यावर केला. रात्री कोळीवाडा आणि  इतिहास.. येथील घटना.. परिस्थिती या संदर्भातील  मोलाची माहिती मते यांनी सांगितली.रविवारी सकाळी भल्या पहाटे या मोहिमेस पुन्हा सुरुवात केली होती. तीन  वेगवेगळ्या ग्रृपने परिसरात साफ सफाई व खोदायीचे काम हाती घेतले होते.गाडलेली व दाट झाडाझुडुपांमध्ये हरविलेली काही जुनी स्मारके आम्ही दृष्टीक्षेपात आणली.त्यामुळे या परिसराचे रूपच पालटले. हे काम संपले आहे असे मुळीच नाही अजूनही खुप काम बाकी आहेच.खरंतर हि सुरुवातच म्हणावी लागेल. शिवाधीन दुर्ग संवर्धन संस्थेचे वतीने हाती घेतलेला हा स्तुत्य उपक्रम आता आम्हांला व आपल्याला देखील या पुढील काळात असाच सुरु ठेवायचा आहे. सिंहगड आणि येथील दुर्लक्षित कोळीवाडे हे एक समिकरणच बनले आहे.या गडाचा विकास केला जात असतानाच बाजूलाच असलेल्या कोळीवाड्यांकडे होत असताना आपण हे सर्व उघड्या डोळ्यांनी पाहत बसने योग्य नाही.स्वातंत्र्य प्राप्तीनंतर देखील पुणे शहरालगतच्या या  कोळिवाड्यावर आजही पिण्याच्या पाण्याची व विजेची कायमस्वरूपी सोय नाही.तानाजी मालुसरे यांनी आदिवासी कोळी महादेव समाजाचे प्रमुख खंडोजी नाईक कोळी यांच्या मदतीने गडावर या चढाई करून आदिवासी कोळी समाजाचे  मदतीने किल्ले सिंहगड जिंकला होता.सुभेदार तानाजी मालुसरे यांनी याच ठिकाणी गोंधळ्याचे वेषात येऊन जागरण गोंधळ घालून आदिवासी कोळी समाजाची गड जिंकण्यासाठी मदत मागीतली होती व कोळी समुह व सैन्याचे मदतीने हा गड जिंकला होता. मालुसरेंच्या पदस्पर्शाने हे कोळीवाडे खरंतर पावणच  झालेले आहेत.या कोळी वाड्यावरील वाड्याचे जुणे  अवशेष.पराक्रम गाजविलेल्या आपल्या आदिवासी कोळी महादेव समाजातील स्थानिक लढवय्या विरांची स्मारके येथे आहेत.आता आपल्याला ती जपायची आहेत.या स्मृती जतन करुन कोळीवाडा व येथील हे ठिकाण प्रकाशात आणायचे आहे.शिवप्रेमी गडप्रेमींना येथे बोलवायचे आहे..प्रशासन.. राज्यकर्ते.. पुरातत्व विभाग व पर्यटन विभागाचे डोळ्यात अंजन घालून कोळीवाड्यांचा विकास..सुधारणा व संवर्धनाच्या  योजना देखील येथे राबवायच्या आहेत.   

*दत्ता जोरकर* (माजी सदस्य पंचायत समिती हवेली) सिंहगड,पुणे

No comments:

Post a Comment

प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण करणार--रमेश दादा पाटील अध्यक्ष कोळी महासंघ.

कोळी महासंघाचे अध्यक्ष रामेशदादा पाटील यांनी महाराष्टरतील 30000 महिलांना प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या माध्यामातून रोजगार मिळवून देण्याचा स...